Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

डोंबिवलीत निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त व अस्वच्छ अन्नपदार्थाची विक्री होतेय ?

विक्री करणाऱ्या स्टॉलधारक, हातगाडीधारक, हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाईकरण्याची मागणी..

शिवसेना माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांचे थेट अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र

डोंबिवली ( शंकर जाधव ) : अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु केली आहे. ठाणे जिल्यातील अनेक शहरात अशा प्रकरच्या कारवाईची अपेक्षा आहे. केडीएमसी कडून मात्र अशांवर करावाई होणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र याकडे पाठ दाखविली आहे. डोंबिवली शहरात रोजरोजपणे नागरिकांन भेसळ केले अन्न दिले जात असून त्यांच्या आरोग्याची मात्र पालिका प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही. म्हणूनच नागरिकांकरता शिवसेना माजी नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक यांनी थेट अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र दिले.डोंबिवली शहरामध्ये निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त व अस्वच्छ अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्या स्टॉलधारक, हातगाडीधारक, हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करणे तसेच अन्नपदार्य हाताळणाऱ्या कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन पत्रात माजी नगरसेविका धात्रक यांनी म्हटले आहे की, आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा, भेसळयुक्त अन्नपदार्थावर नियंत्रण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाबाबत प्रभावी व जनहिताची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाब‌द्दल विश्वास निर्माण झाला असून, नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी आपल्या नेतृत्वाखाली निश्चितपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्या विश्वासातून हे निवेदन सादर करीत आहे. या तक्रारीमागील एकमेव उ‌द्देश म्हणजे डोंबिवली शहरातील नागरिक, विशेषतः युवक-युवती व लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच निकृष्ट व दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे हा आहे.

डोंबिवली शहरातील अनेक चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्‌यावर पनीर चिली, सोया चिली, विविध प्रकारचे मोमोज, चायनीज भेळ, मंचुरियन भेळ, चिकन शावरमा, शेजवान मंचुरियन तसेच इतर फास्ट फूड पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध आहेत. यापैकी अनेक ठिकाणी अन्नसुरक्षेचे मूलभूत नियम, स्वच्छता, सुरक्षित पाणी, अन्नसाठवण आणि वैयक्तिक स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. पूर्वी पावसाळ्यात उघड्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या अनेक हातगाड्यांवर निर्बंध घालण्यात येत असत. मात्र, सध्या अशा प्रकारची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु असून संबंधित यंत्रणेकडून प्रभावी तपासणी व नियंत्रण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय, शहरातील काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे पनीर, चीज आणि इतर खाद्यसाहित्य वापरले जात असल्याचीही तक्रार नागरिकांकडून सातत्याने होत आहे. काही हॉटेले व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित अन्नपदार्थांची निर्मिती आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबतही अनेक नागरिकांच्या वतीने गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवती हे अशा प्रकारच्या फास्ट फूडचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, वापरले जाणारे कच्चे साहित्य, कृत्रिम रंग, रसायने व इतर घटक यांची नियमित तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. निकृष्ट किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे सेवन आरोग्यास अपायकारक ठरू शकते आणि विविध गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

याचबरोबर, अन्नपदार्थ तयार करणारे, हाताळणारे व ग्राहकांना वितरित करणारे कर्मचारी हे कोणत्याही संसर्गजन्य किंवा त्वचारोगाने बाधित नसावेत, याची खात्री करणे देखील तितकेच आवश्यक आहे. अनेक वेळा अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय तपासणी होत नसल्यामुळे त्यांच्यामार्फत अन्न दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांची नियमित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध असल्याची खात्री करण्यात यावी. तसेच वैयक्तिक स्वच्छता, हातमोजे, हेड कॅप, स्वच्छ गणवेश आणि इतर अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही याचीही तपासणी करण्यात यावी. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की डोंबिवली शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून हातगाडीधारक, स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक व खा‌द्यपदार्थ विक्रेत्यांची सखोल तपासणी करण्यात यावी.पनीर, चीज, सॉस, मसाले, तेल, मेयोनीज, शेजवान सॉस तसेच इतर वापरल्या जाणाऱ्या खाद्यसाहित्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. परवाना नसलेले किंवा अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी आपल्या विभागाच्या वतीने नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोंबिवली शहरात सातत्याने निरीक्षण करून अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |