शिवनेरी अकादमीच्या प्रशिक्षणातून मैत्री ठक्करची पोलीस शिपाईपदी निवड
डोंबिवली ( शंकर जाधव ) : परिस्थिती गरीब असली तरी स्वप्नं गरीब नसतात; जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर कोणतेही स्वप्न साकार करता येते. मुलांच्या शिक्षणासाठी आई- वडिलांची जिद्द, मुलांची मेहनत आणि त्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शन यांची साथ मिळाली तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो, हे डोंबिवलीतील मैत्री विनोद ठक्कर हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फुले विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे श्री. विनोद विठ्ठल ठक्कर आणि सौ. आसमा विनोद ठक्कर यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द सोडली नाही. दिवस-रात्र कष्ट करून मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या माता-पित्यांच्या मेहनतीला अखेर यशाचे फळ मिळाले.
त्यांची कन्या मैत्री विनोद ठक्कर हिने डोंबिवलीतील शिवनेरी अकादमी येथे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेतले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात शिपाई पदावर निवड मिळवली. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या असंख्य गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. डोंबिवलीतील शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर हे स्वतः पोलीस दलात कार्यरत असून, गरीब व गरजू कुटुंबातील मुला-मुलींना पोलीस दल, अग्निवीर तसेच विविध शासकीय व प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळावे, या ध्येयाने अकादमीच्या माध्यमातून काम करीत आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक प्रशिक्षण न देता जमिनीवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण, लेखी परीक्षेची तयारी, योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव, मार्गदर्शन आणि मानसिक तयारी अशा सर्व अंगांनी प्रशिक्षण देण्याचे काम शिवनेरी अकादमीच्या माध्यमातून केले जाते. विशेष म्हणजे, डोंबिवलीपुरते मर्यादित न राहता सातारा, सांगली, मुंबई उपनगर, ठाणे तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आपले भविष्य घडवण्यासाठी शिवनेरी अकादमीत येत आहेत. गरीबी ही अडचण असू शकते; पण ती यशाची सीमा नाही,” हा संदेश शिवनेरी अकादमीच्या कार्यातून सातत्याने अधोरेखित होत आहे. या विद्यार्थ्यांच्या संघर्षात शिवसेना परिवाराच्या माध्यमातुन सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची संधी प्राप्त होत होती. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली विविध पुस्तके, शैक्षणिक साहित्य, आवश्यक ते सहकार्य, आर्थिक मदत तसेच मानसिक आधार अशा विविध माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना या अकादमीच्या माध्यमातुन मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक देणे, त्याच्या प्रशिक्षणासाठी मदत करणे किंवा त्याच्या स्वप्नांना बळ देणे ही केवळ मदत नसून एका कुटुंबाचे भविष्य घडविण्याची प्रक्रिया आहे, या भावनेतून हे सामाजिक कार्य केले जात आहे. एखाद्या गरीब घरातील मुलगा किंवा मुलगी आपल्या मेहनतीच्या जोरावर शासकीय सेवेत पोहोचतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या यशात सहभागी होण्याचा आनंद आणि समाधान वेगळेच असते. कारण त्या यशामागे केवळ एका विद्यार्थ्याचे भविष्य घडत नसते, तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनाला नवी दिशा मिळत असते.
मैत्री ठक्करच्या यशामागे तिच्या आई-वडिलांची अथक मेहनत, मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द, स्वतःच्या परिस्थितीची जाणीव ठेवून केलेला संघर्ष आणि मैत्रीने घेतलेली मेहनत आहे. त्यासोबतच शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचे योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सहकार्य या सर्वांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मैत्रीने पोलीस दलात आपले स्थान निर्माण केले आणि “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हे पुन्हा एकदा सिद्ध केले. मैत्री विनोद ठक्कर हिची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या वतीने तिचा, तिचे आई-वडील, तिची बहीण तसेच शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी मैत्रीच्या आई-वडिलांच्या संघर्षाचे आणि त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले, तसेच मैत्री ठक्कर हिला पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ठक्कर कुटुंबीयांशी संवाद साधताना शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे हे सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास यावेळी आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला.मैत्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या पुढील वाटचालीसाठी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास, शिवसेना परिवाराच्या माध्यमातून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य निश्चितपणे करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

