Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश

 ४,७१० लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश 
ठाणे,दि.24 : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे.

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त श्रीमती प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त श्री. सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला.

भेसळीची धक्कादायक पद्धत आणि रंगेहाथ कारवाई

छाप्यादरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात 'एमएच ०४ केयू १६३४' क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहाथ पकडला गेला.

तपासात समोर आले की, १ किलो स्किम मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळून ते प्लंजरच्या साहाय्याने एकजीव केले जात होते. हे भेसळयुक्त दूध गायी-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवले जात होते.

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट..

अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान विविध डेअऱ्यांमधून एकूण ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध (किंमत ₹१,८५,७८०/-) जप्त करून सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आले. याशिवाय १२९.५ किलो पनीर (किंमत ₹४५,२८०/-), ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (किंमत ₹१,६०,८२०/-) आणि ८८.४ किलो क्रीम (किंमत ₹३०,९४०/-) असा एकूण लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

तपासणीदरम्यान मे. पी. के. डेअरीतून ३९३ लिटर म्हशीचे आणि ३६८ लिटर गायीचे असे एकूण ७६१ लिटर दूध (किंमत ₹४०,५५८/-) जागेवरच नष्ट केले गेले.

पुरवठादार मे. भास्कर डेअरी (महापे) येथून ५४८ किलो संशयित पावडर व पनीर (किंमत ₹१,८३,३२०/-) जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला.

मे. नारायण डेअरी (रबाळे) कडील प्रयोगशाळा अहवाल नसलेला ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दुधाचा साठा (किंमत ₹१,२४,०३२/-) नष्ट करण्यात आला, तर मे. फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाकडून ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले.

१५ जणांवर गुन्हा दाखल...

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (FIR क्र. ४३५/२०२६) दाखल करण्यात आला असून संबंधित पेढ्यांचे अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या गुन्ह्यामध्ये शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल, प्रदीप कमलेश यादव, भास्कर संतु पिलानी यांच्यासह मे. महाराज डेअरी (ऐरोली), मे. विजय डेअरी (घणसोली), मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली), मे. रूपसागर डेअरी (ऐरोली), मे. दिनेश डेअरी (ऐरोली), मे. बालाजी डेअरी (ऐरोली), मे. शुक्लम् डेअरी (दिघा), मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे), मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे), मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे), मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे) आणि मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे) या १५ व्यक्ती व पेढ्यांचा समावेश आहे.

ही कारवाई कोकण विभागाचे सह-आयुक्त (अन्न) श्री. अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विक्रम निकम, श्री. प्रशांत पवार, श्री.उत्तरेश्वर बडे, श्री. माणिक जाधव व गुप्तवार्ता पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थात भेसळीचा संशय आल्यास प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सह-आयुक्त डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |