मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साहित्याच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासगी रुग्णालयांतील नफेखोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रुग्णालयांकडून ११ रुपयांना खरेदी केलेली सलाईनची नळी तब्बल ३२५ रुपयांना रुग्णाकडून आकारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सिरिंज, कॅथेटर, ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझरसह विविध वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी किंमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सिरिंजची खरेदी किंमत सुमारे ६.५७ रुपये असताना तिचा छापील MRP ५०.२० रुपये असल्याचे, तर कॅथेटरची खरेदी किंमत २२.८४ रुपये असून रुग्णाकडून ३९० रुपये आकारले जात असल्याचे उदाहरण समोर आले आहे.
या प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचाराच्या खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून वैद्यकीय साहित्याच्या आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
नेमकी कशी होतेय रुग्णांची लूट? हा प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आला असून, खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय साहित्याच्या दरांची पारदर्शकता आणि त्यावर नियमन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
