Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

चांदिवलीतील प्रलंबित नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; आमदार दिलीप लांडे यांची अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक

एचडीआयएल-प्रीमियर वसाहतीतील सुविधा, साकीनाका व संघर्षनगरमधील कामे आणि प्रमोद महाजन उद्यानातील प्रस्तावित रस्त्याचा मुद्दा चर्चेत

मुंबई(शांताराम गुडेकर ) :  चांदिवली विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी सुविधा आणि विकासकामांना गती देण्यासाठी आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या पुढाकाराने गुरुवार (२९ ऑक्टोबर) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. मनपा पूर्व उपनगरे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत विविध नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल संकुल व प्रीमियर वसाहतीतील नागरी सुविधा, रस्त्यांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण, साकीनाका परिसरातील प्रलंबित विकासकामे आणि संघर्षनगरमधील भूमिगत व जमिनीवरील जलवाहिन्यांची कामे यांवर चर्चा झाली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

प्रमोद महाजन उद्यानातील प्रस्तावित रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

पवई येथील हिरानंदानी गार्डन परिसरातील प्रमोद महाजन उद्यानातून प्रस्तावित नवीन रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे हरित क्षेत्र, पक्ष्यांचे अधिवास आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी आमदार दिलीप लांडे आणि महानगरपालिकेला पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. यासंदर्भात रहिवासी सुनीता घोराणी यांनी आमदार लांडे यांना पत्र देऊन हस्तक्षेपाची मागणी केली होती. प्रस्तावित रस्त्याच्या आरक्षणाचा पुनर्विचार करणे, पर्यायी मार्गांचा विचार करणे आणि तोपर्यंत वृक्षतोड रोखण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती.आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवलीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या बैठकीतील चर्चेमुळे नागरी सुविधांचे प्रश्न, विकासकामे आणि पर्यावरण संरक्षणासंबंधीच्या विषयांवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी आमदार दिलीप लांडे यांच्यासह विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व पवई चांदिवलीतील रहिवाशी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |