प्रवाशांच्या हिताची मागणी रेल्वे प्रशासनाकडे
रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर होईल
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) : उरण शहर व ग्रामीण परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गर्दीच्या आणि असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ–उरण लोकल ट्रेन ९ डब्यांऐवजी १२ डब्यांची करण्यात यावी तसेच या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना देण्यात आले.या अगोदरही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी याच विषयावर लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सदर विषयात रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक बैठका झाल्या. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ही मागणी पुन्हा करण्यात आली आहे.
दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत तातडीची असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.सदर समस्या मार्गी लागावी यासाठी युवा नेते प्रितम म्हात्रे सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या पाठपुराव्याला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.
