Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

क्रिकेट खेळामुळे तरुणांचे भवितव्य अंधारात; क्रिकेट मुळे तरुणाई मूळ मुद्द्यापासून भरकटली.

अभ्यास व करिअर कडे क्रिकेट मुळे दुर्लक्ष.

आई वडिलांना लागली मुलांची चिंता.

उरण दि २७ : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. याचा प्रत्यय आता रायगड जिल्ह्यात सर्वत्रयेत आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते मात्र रायगड मधील क्रिकेट खेळाडूना कोणतेही मर्यादा नसल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यातील तरुण क्रिकेटच्या नादी लागून भरकटल्याने त्याची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे.मानवी जीवनात सर्वच खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळत खेळीडू वृत्ती जपली पाहिजे. विविध खेळांतून तरुण राज्य, देश विदेशात प्रतिष्ठा, पैसा कमावतात हे अभिमानास्पद आहे. याच खेळ प्रकारांतील क्रिकेटने आता मैदानांसोबत शेत, माळरान, गल्लीबोळाची जागा घेतली आणि अगदी लहानग्यांपासून वयस्कर लोकही क्रिकेट खेळत गुंतून गेलेत हे आनंदाचे आहे. दुसरीकडे गाव, वाडीपाड्यांतील अनेक तरुणांवर क्रिकेटच्या अतिवेडाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वत्र क्रिकेटच्या जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्या. पूर्वी सुट्टीच्या शनिवारी, रविवारी होणारा क्रिकेट सामना आता आठवड्यातील एकही वार सोडत नाही. त्यातून क्रिकेटच्या मायाजाळात तरुण कधी गुरफटला गेला कळलेच नाही हेच वास्तव जिल्हा, सर्व तालुक्यातून दिसून येत आहे. शहर, ग्रामीणातील तरुणाईला क्रिकेटने अक्षरशः विळखा घातला. अतिवेडाने अनेक तरुणाईतल्या प्रखर ईच्छाशक्ती, महत्त्वकांक्षेचा बळी घेतला, स्वप्नांवर मुरड आली. जणूकाही क्रिकेटचा अतिवेड तरुणांच्या करिअरवर घाला घाततो की काय ? असेच धाडसाने बोलावे लागेल. कंपन्यांत नोकरी, पगाराबाबत मर्यादीत महत्त्वकांक्षा, लहानशा कमाईवर समाधान मानणारा तरुण क्रिकेटच्या अतिवेडातून बाहेर येण्याचे नाव घेत नाही. क्रिकेट मुळे तरुण वर्ग बेभान झाला आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थीही परिपाठ गिरवत आहेत. मग ऐकतोय कोण ? असेच अवघड जागी दुखणं झाले आहे. दरम्यान, आपापली कार्यकर्ता फॅक्टरी टिकवण्यासाठी क्रिकेट टीम, नविन फॅड आलेली लीग स्पर्धेला बक्षीस रूपातून खतपाणी घालण्याच्या पुढारी, नेत्यांच्या परंपरेत आता काही मराठी उद्योजकांनीही क्रिकेट लीगसाठी स्पॉन्सरची खैरात सुरू केल्याने तरुणांची करिअर की अधोगती असाच सवाल उपस्थित झाला आहे, तर नेते, पुढारी राजकारण, नको तो व्यवसाय उभारून मालामाल होत आहेत . उद्योजक शहरात उद्योग उभारून कुटुंबाचे राहणीमान उच्चप्रतीचे करतात, मग ग्रामीण तरुण क्रिकेटमध्ये कितपत गुंतून ठेवावीत ? याचा जरूर विचार करावा लागेल हे अधोरेखित करणे महत्वाचे आहे.

कोकण मुख्यतः रायगडातील तरुण क्रिकेट खेळात अधिक गुंतल्याचे नवीन नाही. जणूकाही व्यसन लागले आहे. रत्नागिरी पट्टयातील तरुण शहरात वेठबिगर म्हणून वावरत आहे आणि रायगड जिल्हा मधील विविध तालुक्यातील,गाव वाडीपाड्यातील तरुण क्रिकेटच्या अधीन गेलाय हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मूळात आज स्थानिक तरुण प्रशासन सेवेत उच्च पदस्थ नोकरीत नाहीत. गटविकास, प्रांत, तहसील, पोलीस क्लास वन अधिकारी नाहीत हे सत्य आहे. तरुणांत मोठी स्वप्नच नाहीत. नोकर भरती, स्पर्धा परीक्षांत टक्का नाही. वनविभाग अन्य नोकर भरतीत रायगडातील एकही तरुण नव्हता, ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे . आता खुद्द विविध ठिकाणी सुरू होणाऱ्या स्पर्धा अकादमीत किती मुले सहभाग घेतात ? याच वास्तवात स्थानिक तरुण क्रिकेटच्या दुनियेत कमालीचा अडकून पडला आहे. नेते, पुढारी, काही उद्योजक अडकवून ठेवत असल्याचे दिसत आहे. क्रिकेटचा वेड आता आदिवासी, ठाकूर तरुणांनाही भुरळ घालत आहे. दुचाकीवर वेगवान तीनचार तरुण जाताना दिसतात, अपघातही होतात. तरुणांत व्यसनही वाढत असल्याचे लपून राहिले नाही. याच चर्चेत क्रिकेटचे अतिवेड आजच्या तरुणांच्या करिअरवर घाला घालत आहे. गाव वाडीपाड्यातील लीग स्पर्धेसाठी आता चक्क मराठी उद्योजकही उतरलेत, बक्षीसांची खैरात करत असल्याचे समोर आल्याने चाललेय काय ? स्वतः यशस्वी उद्योजक क्रिकेट तरुणांत नेमके काय पाहतात, भविष्य काय उज्ज्वल करू पाहतात ? हे अद्याप कळले नाही. तरीही जिल्हा, तालुक्यातील काही तरुणांना क्रिकेट अँकॅडमीत प्रवेश द्यावा, देश, राज्य क्रिकेट संघात जाण्यासाठी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.क्रिकेटच्या अतिवेडाने इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा गिळून टाकली, व्यसनाची मात्रा वाढली, आता क्रिकेट खेळातून उद्यातरी काय साध्य होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नेते, पुढारी सारेजण शिक्षण, रोजगारावर बोलणार नाहीत. किमान यशस्वी उद्योजकाने जाणीवा ठेवून शिक्षण, रोजगार याचे जास्तीचे भान ठेवावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेट खेळामुळे अनेक जणांचे भविष्य घडले तरी अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. क्रिकेट मुळे तरुण वर्ग महत्वाच्या मूळ मुद्द्यापासून भरकटला असून क्रिकेट मुळे विद्यार्थी व तरुणांनी अभ्यास व करिअर कडे दुर्लक्ष केले आहे.मुले सतत क्रिकेट खेळत असल्याने आता आई वडिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |