उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) : अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाची बैठक उरण मध्ये संपन्न झाली. देशातील प्रमुख ११ बंदरात काम करणाऱ्या कामगार महासंघाची बैठक नागाव उरण मध्ये संपन्न झाली. बैठक नाव्हा शेवा बंदर कामगार संघटना ( अंतर्गत ) तर्फे आयोजित करण्यात आले होते.
या बैठकी मध्ये देशातील प्रमुख बंदरात काम करणाऱ्या कायम स्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाबतीत सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यक्रम ठरविण्यात आले. संरक्षणच्या व आयात निर्यात व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा उद्योग देशी व विदेशी कंपन्यांना देण्यात येत आहे. कायम स्वरूपी कामगार कमी करून त्यांचे जागेवर सर्वत्र कंत्राटी कामगार भरण्यात येत आहेत. समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार देउन रबावले जात आहे. तसेच देशातील अनेक खाजगी विदेशी कंपन्याच्या बंदरात कामगारांना कमी पगारावर रबावले जात आहे. जेएनपीटी (जेएनपीए )मधील सिंगापूर पोर्ट, गुजरात मधील अदानीचे मुंद्रा पोर्ट येथे कामगारांचे मोठया प्रमाणात शोषण होतं आहे या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील पोर्ट व डॉक कामगारांचा चालू वेतन करार ३१ डिसेम्बर २०२६ रोजी संपणार आहे.१ जानेवारी २०२७ ते ३१ डिसेंबर २०३१ या ५ वर्षाच्या नवीन वेतन करारासाठी मागणी पत्रक बनविण्यात येणार आहे. कायम स्वरूपी कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना पगार वाढीसाठी कामगार महासंघ प्रयत्न करणार आहे अशी माहिती महासंघाचे सचिव कॉ. भूषण पाटील यांनी दिली.
या मिटिंग मध्ये जेष्ठ कामगार नेते माजी खासदार कॉ. तपन सेन व सिटू राष्ट्रीय सचिव कॉ. करुमालायन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.मिटिंगचे काम महासंघाचे अध्यक्ष कॉ. सी डी नंदकुमार यांनी केले तर अहवाल सरचिटणीस कॉ. टी नरेंद्र राव यांनी सादर केला.देशातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधिनीं त्यावर चर्चा केली. महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात चेन्नई बंदरात घेण्यात येणार आहे.या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकी साठी जेनपिटी अंतर्गत युनियन कार्याध्यक्ष गणेश घरत, अध्यक्ष दिनेश घरत, सचिव राजेश घरत व नंदू म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली.

